बँकिंग बोधकथा
कॅश क्रेडीट
हा एक सर्व ग्राहकांना आवडणारा कर्जाचा प्रकार. अशी खाती अनुत्पादक होऊ नये म्हणून घ्यावयाची दक्षता
दक्षता हा शब्द सध्याच्या कार्यप्रणालीने गुळगुळीत केला आहे. कॅश क्रेडीट म्हणजेच उधारीवर रक्कम उचलण्याची सोय, पण यात खरी दक्षता घेतली जाते कां?
एका पार्टीस असे कर्ज मंजूर केले. नवीन साहेब आले की, कोणती पार्टी किती चांगली, हे ठसविण्याचा ठराविक कार्यक्रम ठराविक स्टाफ करतात. ठराविक स्टाफ उदासिन असतात. आपण भले आपले काम भले.
कॅशक्रेडीट म्हटले की वर्षाची मुदत ठरलेली व पुढे परतफेड करावयाचीच नाही. जणू हे कर्ज न फेडण्यासाठीच असते. पूर्वी काही बॅंकेत असे कर्ज वर्षातून एकदा भरावे लागे. एका दिवसांत एवढे पैसे कोठून आणणार? त्यातून सावकारी व गैरव्यवहार सुरू झाले. व त्यातून नियमात बदल करून वर्ष अखेर संपूर्ण व्याज वसूल करून ताळेबंद व आर्थिक कागद पत्रानुसार मंजूर मर्यादेचे नूतनीकरण सुरू झाले. पण ह्यातही धोके राहतातच.
नजर गहाण हा सवार्र्ंत सोपा प्रकार. दर महिना अखेर स्टॉक स्टेटमेंट द्यावयाचे व त्या आधारावर ठराविक मार्जीन ठेवून उचल करू द्यावयाची.
वरील पार्टीस अशीच मर्यादा मंजूर झाली. नियमित स्टेटमेंट व व्यवहार सुरू होते.
पण साडेसाती का, कोणत्या कारणाने तपासणी करण्याचे ठरविले तर स्टॉक स्टेटमेंट मध्ये गडबड वाटली. मागील 6 महिन्याची स्टॉक स्टेटमेंट थोड्या फार फरकाने सारखीच होती. फक्त मालाचे वर्णन खाली वर होते. किंमती जुन्याच होत्या. बेरजेतही तफावत होती. पूर्ण तपासणी केली असता बरीच तफावत आढळली. म्हणजेच पर्यायाने उचल मर्यादा कमी होती. अशा प्रकारे सूत्र पक्के समजून रक्कम अदा केली.
त्याच खातेदाराची दुसरी फर्म होती. त्यांचे आपापसांत व्यवहार होते. व त्या फर्मने दुसऱ्या बॅंकेतून तारण मर्यादा घेतली होती. गोडावून चारी दिशांना दारे असलेले प्रशस्त होते. मध्ये भिंतीचा भाग दाखवून चार गोडावून असल्याने पार्टी चांगली असल्याने बॅंकेस पटले. त्या गोडावून मधेच माल एका बॅंकेस तारण म्हणून तर दुसरीस नजर गहाण होती. जी बॅंक तपासणीस येईल त्या बॅंकेस कोणत्या दरवाजाने न्यायचे, याचे नियोजन उत्तम होते.
स्टॉक स्टेंटमेंट बरोबरच जागृत अधिकाऱ्याने चंद्राप्रमाणे स्वत: भोवती व पृथ्वी भोवती चकरा (प्रदक्षिणा) घातल्या आणि कोठे अंधार, कोठे उजेड, कोठे ग्रहण ह्याचा, त्याच्या मनाने वेध घेतला आणि पूर्णत: सर्व कोडे उलगडले. दोन्ही कर्जदाराची खाती एनपीए झाली व वसुली व खाती नियमित करण्याची धडपड झाली.
आपण सगळे तज्ञ आणि अनुभवी आहोत, परंतु केवळ दक्षता न घेतल्याने म्हणजेच भाकरी न फिरवल्याने जशी करपते तसे झाले.
सुविचार :
जो दुसऱ्यावर विश्र्वासला।
त्याचा कार्य भाग बुडाला।।
एक अनुभवी बॅंकर